बेळगाव : संविधान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने युवा समिती कार्यालयात संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले, “विविधतेतून नात्यातला देश आणि त्या देशाचा राज्यकारभार कसा चालावा, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वोत्तम संविधान आपल्याला दिले. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही संविधानाची मूलतत्त्वे आहेत. सीमाभागातील मराठी भाषिकांवर आजही अन्याय होत असताना, संविधानाने दिलेल्या हक्कांसाठी लढणे हेच खरे संविधानाला अभिवादन ठरेल. भाषेच्या आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी संविधानिक मार्गाने आमचा लढा सुरूच राहील.”
यावेळी बोलताना सरचिटणीस श्रीकांत कदम म्हणाले, “२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून ते लागू करण्यात आले. २०१५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.”
यावेळी उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, विनायक कावळे, सूरज कुडूचकर, प्रवीण रेडेकर आदी उपस्थित होते.








