• राकसकोप जलाशयात दोन महिन्यांचा साठा उपलब्ध
  • जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

बेळगाव : सध्या बेळगाव जिल्हा आणि शहरात पिण्याच्या पाण्याची कोणतीही समस्या नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पुढील काळासाठीही प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, राकसकोप जलाशयात सध्या सुमारे दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासत नाही. मात्र, भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाने टँकर तसेच खाजगी बोअरवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याची तयारी करून ठेवली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यासाठी कृष्णा, घटप्रभा आणि मलप्रभा या नद्यांवर अवलंबून राहावे लागते. या पाण्याच्या वापराबाबत नियोजन करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हिप्परगी जलाशयात सध्या ६ टीएमसीपैकी २ टीएमसी पाणी शिल्लक असून ते प्राधान्याने पिण्यासाठी वापरले जात आहे. याशिवाय महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून राजापूर बॅरेजमार्फत कृष्णा नदीत दोन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

घटप्रभा नदीच्या डाव्या व उजव्या कालव्यांमध्ये लवकरच पाणी सोडण्यात येणार असून, सध्या सुरू असलेल्या कामांमुळे यासाठी सुमारे दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. मलप्रभा नदीचे पाणी धारवाड व रोणा भागातही सोडण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. दुपारी १ ते २ या वेळेत बाहेर पडणे टाळावे तसेच शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी पिण्याच्या पाण्यात मीठ-साखर मिसळून सेवन करावे, असा सल्लाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.