बेळगाव : वकील असल्याचा दावा करणाऱ्या पाय गंभीरपणे संक्रमित झालेल्या आणि प्रकृती खालावलेल्या एका असहाय्य वयोवृद्ध व्यक्तीच्या मदतीला धावून जात सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज बुधवारी बेळगाव न्यायालय आवारात घडली.

बेळगाव न्यायालय आवारात स्वतः वकील असल्याचा दावा करणारी एक वयोवृद्ध व्यक्ती असहाय्य अवस्थेत असल्याची माहिती आज सकाळी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पथकाला मिळाली. तेव्हा कोणताही विलंब न करता सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, ॲलन विजय मोरे, पद्मप्रसाद हुली, शशिकांत आंबेवाडकर, विकी मेहता यांच्यासह वकील रोहित कडगवी आणि इतर कांही वकील त्या व्यक्तीला भेटून चौकशी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्या व्यक्तीच्या पायाला झालेल्या जखमेचे गांभीर्य आणि वैद्यकीय उपचारांची तातडीची गरज ओळखून सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राथमिक मदत पुरवली. त्यानंतर आपत्कालीन उपचारांसाठी त्या व्यक्तीला तात्काळ बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था केली. ती व्यक्ती सध्या हॉस्पिटलमध्ये निरीक्षणाखाली असून, डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक वैद्यकीय उपचार देत आहेत.

ही घटना संकटात सापडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी वेळेवर हस्तक्षेप आणि सामूहिक मानवतावादी प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करते.