बेळगाव : बहुकोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आरोपी शिवानंद नीलण्णावर याला न्यायालयाने १० दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. पुढील चौकशीसाठी त्याला बंगळुरू येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बेळगावच्या दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गंगाधर के. एन. यांनी हा आदेश दिला. सुमारे ३५ हजार गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय असलेल्या या प्रकरणात राज्याबाहेर जाऊनही तपास करावा लागणार असल्याचे सांगत सीआयडीने कोठडीची मागणी केली होती.
सुनावणीदरम्यान आरोपीने स्वतःला मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
यावेळी न्यायालयात आरोपी आणि न्यायाधीशांमध्ये काही महत्त्वपूर्ण संवादही झाला. “३५ हजार लोकांपेक्षा मला पैशांची गरज आहे,” असे आरोपीने म्हटल्याचे सांगितले जाते. त्यावर न्यायाधीशांनी सामान्य नागरिकांच्या हिताचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत कठोर शब्दांत सुनावल्याची माहिती मिळाली.
न्यायालयातून बाहेर येताना आपल्या भावाला पाहून शिवानंद नीलण्णावर भावूक झाल्याचेही उपस्थितांनी सांगितले.
दरम्यान, सीआयडी डीजीपी भीमाशंकर गुळेड़ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्राथमिक तपास पूर्ण केला असून, माळमारुती पोलीस ठाणे यांनी जमा केलेली कागदपत्रे सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. आरोपीला पुढील चौकशीसाठी बंगळुरू येथे नेण्यात येणार आहे.
आरोपीच्या वतीने त्याचे वकील मंजुनाथ जी. एल. यांनी माध्यमांशी बोलताना, हे प्रकरण तांत्रिक स्वरूपाचे असून आरबीआय नियमांच्या कथित उल्लंघनाशी संबंधित असल्याचा दावा केला. कोणत्याही गुंतवणूकदाराने अधिकृत तक्रार केलेली नसून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.








