- बेळगाव जिल्ह्यातील सुमारे ४०० प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट
बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित असलेले खटले तडजोडीने सोडवण्यासाठी कर्नाटक राज्य विधी सेवा प्राधिकरणाने विशेष पुढाकार घेतला असून ‘समाधान समारोह’ या उपक्रमांतर्गत विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.
या मोहिमेत बेळगाव जिल्ह्यातील सुमारे ४०० प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पक्षकारांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. न्यायप्रक्रिया जलद आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावर ही लोकअदालतीची मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप पाटील यांनी दिली.
२१ एप्रिलपासून या उपक्रमाची पूर्वतयारी सुरू झाली असून २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ही प्रक्रिया पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या कर्नाटकातील एकूण ४,१२८ प्रकरणांपैकी बेळगाव जिल्ह्यातील ४०० प्रकरणांचा यात समावेश आहे.
तालुका स्तरावर पक्षकार आणि सल्लागार यांच्यात समन्वय साधून तडजोड झाल्यानंतर ही प्रकरणे विधी सेवा प्राधिकरणामार्फत सर्वोच्च न्यायालयात पाठवली जाणार आहेत. या प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेता येणार असल्याने वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. अधिकाधिक पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संदीप पाटील यांनी केले आहे.








