बेळगाव : वंटमुरी कॉलनी परिसरात होणारा बालविवाह अक्का पथक आणि पोलीस विभागाने वेळेत हस्तक्षेप करून रोखला असून १७ वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
गुरुवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, २० एप्रिल रोजी गस्तीवर असताना अक्का पथकाच्या कर्मचाऱ्यांना एका घरासमोर उभारलेला लग्नाचा मंडप दिसला. संशय आल्याने चौकशी केली असता, २१ एप्रिल रोजी अल्पवयीन मुलीचा विवाह पुण्यातील एका तरुणाशी होणार असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी मुलीचे आधार कार्ड आणि जन्म दाखला तपासला असता तिचे वय १७ वर्षे ४ महिने असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महिला पोलीस ठाणे, चाईल्ड हेल्पलाईन आणि माळमारुती पोलीस ठाण्याच्या ११२ पथकाने संयुक्त कारवाई करत हा विवाह थांबवला.
सुटका करण्यात आलेल्या मुलीला पुढील कार्यवाहीसाठी बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांविरुद्ध बेळगाव शहर महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.








