बेळगाव : पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ्ळमठ परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बेळगाव शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) अंतिम मंजुरी दिली असून, निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पाऊस कमी होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

बडेकोळ्ळमठ परिसरातील पुणे-बेंगळुरू महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने बेळगाव शहर पोलीस विभागाने याबाबत एनएचएआयकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर प्राधिकरणाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कायमस्वरूपी दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिली आहे.

दरम्यान, कायमस्वरूपी काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघातप्रवण ठिकाणी पाण्याचे ड्रम, वाहतूक कोन, परावर्तित मानवी आकृत्या आणि दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत.

या सुरक्षाव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यरत आहेत. कायमस्वरूपी उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी व्यक्त केला.