- आठ दिवसांच्या दहशतीनंतर वन विभागाच्या मोहिमेला यश
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील वंटमुरी घाटामागील सुतकटी (सुतगट्टी) गावाच्या वनक्षेत्रात गेल्या आठ-दहा दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या सापळ्यात जेरबंद झाला. बुधवारी पहाटे पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला वन विभागाने सुरक्षित ताब्यात घेतल्यानंतर सुतकटी, शिवापूर आणि परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.
गेल्या काही दिवसांपासून सुतकटी आणि शिवापूर परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी, ग्रामस्थ तसेच वाहनचालकांना अनेकदा बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी काकती वन विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती.
तक्रारींची गंभीर दखल घेत वन विभागाने परिसरात गस्त वाढवून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. सुतकटीच्या वनक्षेत्रात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बुधवारी पहाटे बिबट्या अडकल्याने वन विभागाच्या नियोजनबद्ध मोहिमेला यश आले.
ही कारवाई काकतीचे आरएफओ बी. एल. सनदी, हुक्केरीचे आरएफओ शिवकुमार माळी, डीआरएफओ बसवराज हनगंडी, तसेच प्रभू तंगडी, राकेश मुरारी, मुतगेकर आणि काकती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या मोहिमेत सुतकटी गावातील ग्रामस्थांनीही मोलाचे सहकार्य केले.







