बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन, सरकारी मराठी प्राथमिक शाळा तसेच बीजगर्णी मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, मराठी शाळांची पटसंख्या वाढविणे आणि मराठी शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मराठी शाळांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल. त्यामुळे मराठी शाळांना बळकटी देण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
युवा समितीतर्फे गेल्या नऊ वर्षांपासून मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जात आहे. दरवर्षी सुमारे ३०० शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळत असल्याची माहिती देण्यात आली.
बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला बालवीर सोशल फाउंडेशनचे संचालक राजू मुजावर, पुंडलिक सुतार, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, सिद्धेश्वर तुर्केवाडकर, गोविंद गावडे, सुषमा सुतार, कल्याणी गावडे यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
बेळगुंदी मराठी प्राथमिक शाळेतील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम कमिटीचे अध्यक्ष किरण मोटनकर होते. त्यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रभारी मुख्याध्यापिका एम. बी. नागन्नावर, सहशिक्षक श्री. बेल्लारी आणि सहशिक्षिका बेबीताई झंगरूचे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
या वेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष राजू कदम, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, खजिनदार विनायक कावळे, तसेच पदाधिकारी निखिल देसाई, युवराज सुतार, रामा अमरोळकर आणि शुभम कुन्नुरकर उपस्थित होते.








