• जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींची रक्कम जमा केल्याचा आरोप
  • कागदपत्रांची तपासणी

बेळगाव : जादा व्याजाचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये जमा केल्याचा आरोप असलेल्या शिवम असोसिएट्स कंपनीविरोधातील तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिवानंद नीलण्णावर यांच्या शिवबसव नगर येथील निवासस्थानी शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. यावेळी अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि महत्त्वाच्या नोंदींची तपासणी केली.

या प्रकरणात यापूर्वी बड्स कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या सीआयडीकडून तपास सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीनेही स्वतंत्रपणे कारवाई करत प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे.

ईडीच्या पथकाने शिवानंद नीलण्णावर यांच्या निवासस्थानी तपासणी करताना त्यांच्या पत्नी संगीता आणि जावई संजू यांचीही चौकशी केली. मंगळुरू आणि गोवा येथील ईडी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, नीलण्णावर यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवरही ईडीने झडती घेतली. बेळगाव जिल्ह्यातील बडकुंद्री येथील घर तसेच चिक्कोडी येथील सुभाष यांच्या निवासस्थानीही तपास करण्यात आल्याची माहिती आहे.

या प्रकरणात १५ मे रोजी बेळगाव सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला. सीआयडीचा तपास सुरू असतानाच ईडीच्या कारवाईमुळे शिवम असोसिएट्स प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.