- संकेश्वर पोलिसांकडून फरार सावकाराला अटक
- अडीच पट रक्कम परत करूनही अतिरिक्त पैशांचा तगादा
- जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
संकेश्वर : अवैध सावकारी करून कर्जदाराकडून मुद्दल आणि व्याजासह मोठी रक्कम वसूल केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरार असलेल्या एका सावकाराला संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. करजगा येथील महिलेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सदानंद भीमराव हलगे (वय ४७) असे आहे. तक्रारदार महिलेने घेतलेल्या कर्जाची मुद्दल आणि व्याज मिळून ३६.७७ लाख रुपये परतफेड केली होती. मात्र, एवढी रक्कम मिळूनही आरोपीने आणखी ४.६४ लाख रुपये देण्याची मागणी करत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध सुरू असतानाच २२ जुलै रोजी कणगला गावाजवळून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संकेश्वर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संकेश्वर पोलीस करत आहेत.








