- पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : पावसाने ओढ दिल्याने अतिवाड परिसरात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून पिके वाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर अतिवाड (ता. बेळगाव) गावासह बेळगाव तालुका तातडीने ‘दुष्काळग्रस्त’ घोषित करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई आणि मदत द्यावी, या मागणीसाठी अतिवाड येथील शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी विविध प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
पावसाअभावी सध्या पिके सुकू लागली असून ती वाचवण्यासाठी दररोज किमान सात तास अखंडित वीजपुरवठा आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, सध्या केवळ दोन तास वीजपुरवठा होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सात तास वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली.
- सर्वे क्रमांकांच्या एकत्रीकरणामुळे शेतकऱ्यांची गैरसोय :
महसूल विभागाच्या कारभाराबाबतही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. विविध सर्वे क्रमांकांचे एकत्रीकरण करण्यात आल्याने सातबारा उतारा काढताना अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. एका सर्वे क्रमांकाच्या उताऱ्यावर २० ते २५ जणांची नावे आणि अनेक पाने येत असल्याने स्वतःच्या जमिनीचा उतारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहे.
त्यामुळे एकत्रित करण्यात आलेले सर्वे क्रमांक तातडीने स्वतंत्र करावेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र उतारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी कर्नाटक राज्य रयत संघाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष बसवराज रुद्रप्पा मोकाशी, जिल्हा सरचिटणीस सुरेश व्ही. करविनकोप, तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, तालुका उपाध्यक्ष वैजू एल. लुम्याचे, राज्य महिला संयोजिका पार्वती व्ही. कळसण्णावर, जिल्हा कार्यदर्शी कुमार श्री नावि, खानापूर भागाचे प्रसाद कुलकर्णी यांच्यासह शेतकरी नेते, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








