• १५.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

हुक्केरी : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत आंतरराज्य दुचाकी चोरट्यांच्या टोळीसह पाच जणांना अटक केली असून, एकूण १५.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. के. रामराजन आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रामगोंडा बसरगी यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरीचे निरीक्षक महंतेश बसापुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

या कारवाईत आंतरराज्यीय दुचाकी चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या उमेश हनुमंत गाडीवड्डर याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून मिरज, बेळगाव, गोकाक यांसारख्या विविध ठिकाणांहून चोरलेल्या ६ लाख रुपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

तसेच महाराष्ट्रातील रहिवासी दीपक मछिंद्र जाधव याला अटक करून त्याच्याकडून ४.५० लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या साखळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

ट्रॅक्टर-ट्रेलर चोरी प्रकरणात होनगा येथील अर्जुन बसवंत शेंद्री याला अटक करण्यात आली असून, बसमधील प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या निपाणी येथील आरती लोंडा व पूजा चौगुले यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याशिवाय कोटबागी येथील मुथप्पा कामाशेट्टी यांच्याकडून ५०,००० रुपये किमतीच्या बकऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी एकूण १५ गुन्ह्यांचा छडा लावून १५.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.