• मंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव : राज्य सरकारने जाहीर केलेले अंतर्गत आरक्षण हे अनेक दशकांपासूनची मागणी पूर्ण करणारा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय एकमताने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले की, विशेष मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्री आणि विविध समुदायांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. या घोषणेमुळे सर्वच घटकांमध्ये समाधानाचे वातावरण असून कोणताही मतभेद नोंदवला गेला नाही.

भाजपकडून होत असलेल्या विरोधावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक निर्णयावर विरोधक टीका करतात, हे स्वाभाविक आहे. मात्र, लोकहिताचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाला जनतेचा व्यापक पाठिंबा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विरोधकांकडून केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अशा प्रतिक्रिया दिल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसमधील नेतृत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जारकीहोळी म्हणाले की, पक्षश्रेष्ठी लवकरच सर्व प्रश्नांवर तोडगा काढतील. हायकमांडने आवश्यक निर्णय घेतले असून योग्य वेळी त्याची अंमलबजावणी होईल, असे त्यांनी नमूद केले.

तसेच, डी. के. शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या अनुषंगाने दिल्लीला जाणे ही नियमित बाब आहे. या दौऱ्याचा संबंध नेतृत्वबदलाशी जोडणे योग्य नसून प्रत्येक हालचालीत राजकारण शोधणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.