बेळगाव : शहरात होणारी डीएलएड पूरक परीक्षा शांततेत, पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. परीक्षा केंद्राभोवती २०० मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
२७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत डीएलएड प्रथम व द्वितीय वर्षाची पूरक परीक्षा आयोजित करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मन्नूर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) परीक्षा केंद्राभोवती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
या आदेशानुसार परीक्षा केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारे गर्दी जमविणे, एकत्र येणे किंवा हालचाल करणे यावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच परीक्षा कालावधीत परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने, सायबर कॅफे आणि इंटरनेट केंद्रे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
फक्त अधिकृत कर्मचारी व परीक्षार्थींनाच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र परिसरात ध्वनिवर्धकाचा वापर, घोषणा अथवा कोणत्याही प्रकारचे गोंगाटपूर्ण वातावरण निर्माण करणे यालाही बंदी घालण्यात आली आहे.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे.







