बेळगाव : श्रीराम सेना हिंदूस्थान, अनगोळ आयोजित ‘बेळगाव हिंदकेसरी’ तिसऱ्या पर्वातील जंगी बैलगाडा शर्यतीला कालपासून श्री मरगाई देवी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव या ठिकाणी प्रारंभ झाला असून उद्या रविवारी होणाऱ्या शर्यतींसह समारोप समारंभाला देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचे आयोजक डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
श्रीराम सेना हिंदूस्थान, अनगोळ आयोजित “बेळगाव हिंदकेसरी” या दि. २४, २५ व २६ एप्रिल २०२६ असे तीन दिवस चालणाऱ्या बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून 250हून अधिक प्रसिद्ध बैलजोड्या सहभागी झालेल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर व उत्कृष्ट नियोजन यासाठी ही शर्यत प्रसिद्ध आहे. श्रीराम सेना हिंदूस्थान, अनगोळ विभाग प्रमुख उमेश कुऱ्याळकर यांच्या अध्यक्षतेखाली काल या शर्यतीचा उद्घाटन समारंभ पारंपारिक पद्धतीने पार पडला. शेतकरी बांधवांच्या हस्ते गाड्यांचे पूजन करून शर्यतीला सुरुवात करण्यात आली. आता उद्या शेवटच्या दिवशी होणाऱ्या शर्यतींसह समारोप समारंभाला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे उपस्थित असणार आहेत. दोन वेळा महाराष्ट्र केसरी जिंकून कुस्ती आखाडा गाजवलेले चंद्रहार पाटील आता त्यांच्या देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीच्या आयोजनासाठी प्रसिद्ध आहेत.








