- ‘मल्लविद्येचा महासंग्राम’ रंगणार
सांबरा : बेळगाव तालुक्यातील सांबरा येथे रविवारी (दि. २६ एप्रिल) दुपारी ३ वाजता ‘मल्लविद्येचा महासंग्राम’ या भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. कमल (कम्मार) तलाव परिसरात रंगणाऱ्या या मैदानासाठी आयोजकांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
या कुस्ती मैदानातील पहिल्या क्रमांकाची मुख्य कुस्ती पुण्याचा ‘हिंदू गर्जना केसरी’ पै. शुभम सिधनाळे आणि हरियाणातील सोनीपतचा ‘भारत केसरी’ पै. अजय वरण यांच्यात होणार असून, ही लढत विशेष आकर्षण ठरणार आहे.
तसेच अन्य प्रमुख कुस्त्यांमध्ये दसरा कंठीरवा केसरी पै. कामेश विरुद्ध दिल्लीचा पै. करण, उत्तर कर्नाटक केसरी पै. शिवा दड्डी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. सत्पाल, कर्नाटक चॅम्पियन पै. प्रेम विरुद्ध इस्लामपूरचा पै. शिवकुमार जंगम, तसेच शिरगुप्पीचा पै. सचिन विरुद्ध सांगलीचा पै. सौरभ मरकड यांच्या कुस्त्या रंगणार आहेत. याशिवाय ५० हून अधिक लहान-मोठ्या चुरशीच्या कुस्त्यांची मेजवानी कुस्तीप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.
सांबरा कुस्तीगीर कमिटीचे पदाधिकारी यल्लाप्पा हरजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मैदानासाठी नव्याने आखाडा उभारण्यात आला असून गावकऱ्यांच्या सहकार्याने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महासंग्रामाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








