• जिल्हा न्यायालयाचा निकाल

बेळगाव : नेहरू नगर येथे २०२० मध्ये घडलेल्या शाहबाज हत्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हत्या आणि अर्फानवरील जीवघेणा हल्ला सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

२५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या या प्रकरणाची सुनावणी द्वितीय जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. खटल्यादरम्यान ३० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून १२८ हून अधिक पुरावे सादर करण्यात आले. सर्व पुरावे आणि साक्षींचा विचार करून न्यायाधीश गंगाधर के. यांनी आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

लक्ष्मण फकिरप्पा दड्डी, बसवराज होळेप्पा दड्डी, बसवराज सिद्रायी सिद्दप्पा नायक आणि नवीन सिद्दप्पा दड्डी अशी दोषींनी नावे आहेत. न्यायालयाने चौघांवर एकूण ९ लाख ६० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्यापैकी ८ लाख रुपये मृताच्या पालकांना, तर १ लाख रुपये जखमी अर्फानला देण्याचे आदेश दिले आहेत.

या खटल्यात सरकारी वकील भारती होसमनी यांनी युक्तिवाद केला, तर निकालाच्या तांत्रिक बाबींविषयी सरकारी वकील आर. ए. गडकरी यांनी माहिती दिली.