• विद्यार्थ्यांच्या सुरेल सादरीकरणांनी रसिक मंत्रमुग्ध
  • २१ दिवसांच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : शहरातील सांस्कृतिक वातावरण समृद्ध करणाऱ्या दहाव्या ‘हसत-खेळत संगीत शिबिरा’ची सांगता मंगळवार (दि. २१) रोजी टिळकवाडी येथील जीजी चिटणीस इंग्लिश मीडियम स्कूल येथे करण्यात आली. अंतिम कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल गायन व सांगीतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.

या शिबिरात विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत संगीताची प्राथमिक तत्त्वे आत्मसात केली. गायन, ताल-लय, स्वरांची ओळख आणि सादरीकरण कौशल्य यांचे प्रशिक्षण अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, मंचावरील भीती दूर करणे आणि समूहात काम करण्याची सवय रुजवण्यावरही भर देण्यात आला.

सांगता समारंभात समूहगायनासह विविध सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी रंगली. काही विद्यार्थ्यांनी स्वतंत्र सादरीकरण करत आपली खास कला सादर केली. शिबिराच्या यशस्वी आयोजनाचा आढावा घेत मार्गदर्शकांनी आपले मनोगत व्यक्त केले. संयोजिका चंद्रज्योती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली २१ दिवस चाललेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.