संकेश्वर : हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात एका ३५ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. बाबू भुसगोळ असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वैयक्तिक कारणांमुळे निर्माण झालेल्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या तपासात मृत व्यक्तीचे एका महिलेशी जवळचे संबंध असल्याचे समोर आले असून, त्यावरून संबंधित महिलेचा पती आणि त्याच्या एका सहकाऱ्यासोबत वाद निर्माण झाला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या वादाचे पर्यवसान हल्ल्यात झाले असून, धारदार शस्त्रासह इतर वस्तूंचा वापर करून बाबू भुसगोळ यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेमागे केवळ वैयक्तिक वादच नव्हे तर रस्ता अतिक्रमणासंदर्भातील मतभेद आणि मृत व्यक्तीच्या कथित त्रासामुळेही तणाव निर्माण झाला होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच संशयित दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.








