• सांबरा गावाजवळ मुलासमोरच घडली हृदयद्रावक घटना
  • दुचाकीला अचानक ब्रेक लावताच मागे बसलेली आई खाली पडली

सांबरा : बेळगाव तालुक्यातील सांबरा गावाजवळ गुरुवारी झालेल्या दुर्दैवी अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. रस्ता ओलांडणाऱ्या भटक्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावल्यानंतर हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पंत बाळेकुंद्री येथील महंतेश कलमठ हे आपल्या आई शांताव्वा कलमठ यांना दुचाकीवर मागे बसवून महांतेशनगरकडे जात होते. सांबरा गावाजवळ पोहोचताच अचानक एक भटका कुत्रा दुचाकीसमोर आला. त्याला धडक लागू नये म्हणून महंतेश यांनी तत्काळ ब्रेक दाबला.

अचानक लावलेल्या ब्रेकमुळे मागील सीटवर बसलेल्या शांताव्वा यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी मुलासोबत प्रवास करणाऱ्या आईचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने कलमठ कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाची नोंद मारिहाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे.