• उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म. ए. समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना हत्तरगी टोल नाक्यावर पोलिसांनी रोखल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. या घटनेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन छेडले. दरम्यान, कोल्हापुरात पोहोचलेल्या समितीच्या दुसऱ्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सीमाप्रश्नाबाबत निवेदन सादर केले. यावेळी अमित शाह यांच्याशी चर्चा करून समितीसोबत योग्य ती बैठक आयोजित करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.

अमित शाह यांच्या भेटीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते कोल्हापूरकडे रवाना झाले होते. मात्र, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेचा दाखला देत बेळगाव पोलिसांनी हत्तरगी टोल नाक्यावर त्यांची अडवणूक केली. या कारवाईबाबत समितीचे नेते अमर येळ्ळूरकर यांनी तीव्र आक्षेप घेत लेखी आदेशाची मागणी केली. मात्र, पोलिसांनी आदेश दाखवण्यास नकार दिल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

सीमाभागातील मराठी भाषिकांवर सात दशकांपासून होत असलेल्या अन्यायाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि सीमाप्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी करण्यासाठी अमित शाह यांची भेट घेण्याचा समितीचा प्रयत्न होता. यासाठी कोल्हापूर प्रशासनाकडे वेळ मागण्यात आला होता. तसेच ‘पुढारी’ वृत्तपत्राचे संपादक प्रतापसिंह जाधव यांनीही ही भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती समितीच्या नेत्यांनी दिली.

दुसरीकडे, कोल्हापुरात पोहोचलेल्या समितीच्या दुसऱ्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सीमाप्रश्नाशी संबंधित निवेदन सादर केले. राज्य पुनर्रचना आयोगामुळे झालेला अन्याय दूर करावा आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याला गती द्यावी, अशी मागणी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी यावेळी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत अमित शाह यांच्याशी चर्चा करून समितीसोबत योग्य ती बैठक आयोजित करण्याचे तसेच मराठी भाषिकांच्या मागण्यांबाबत आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.