• नियमभंग करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

बेळगाव : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांसोबतच नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील परिसरात नो पार्किंगमध्ये उभी करण्यात आलेली अनेक वाहने टोईंग करून जप्त करण्यात आली.

वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू असतानाच चुकीच्या पद्धतीने वाहने पार्क करणाऱ्यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील रस्त्यावर नो पार्किंगचा फलक असतानाही अनेक वाहनचालकांनी वाहने उभी केल्याचे आढळून आले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅनच्या सहाय्याने ही वाहने हटवून पोलीस ठाण्यात जमा केली.

शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. मात्र, काही वाहनचालकांकडून नियमांकडे दुर्लक्ष करून नो पार्किंगच्या जागेत वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

याशिवाय काही मालवाहू वाहनेही रस्त्याच्या कडेला अथवा नो पार्किंग क्षेत्रात उभी केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा वाहनांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत ती जप्त केली आहेत. वाहतूक नियमांचे पालन करून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.