- गोकाकच्या प्रेमीयुगुलाची संरक्षणासाठी एसपी कार्यालयात धाव
बेळगाव : आई-वडिलांच्या तीव्र विरोधाला न जुमानता लग्न केलेल्या गोकाक येथील प्रेमीयुगुलाने आज बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत संरक्षणाची मागणी केली आहे. “जात वेगळी असली तरी प्रेम एकच आहे,” असे म्हणत या जोडप्याने आपल्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे सहकार्य मागितले.
गोकाक फॉल्स परिसरातील शिवाप्पा मूकगोळ आणि विमला भोवी हे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय त्यांनी मंदिरात विवाह केला. मात्र विवाहाची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर घरातच नजरकैद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नजरकैदेत असतानाही विमलाने घरातून सुटका करून थेट एसपी कार्यालय गाठले आणि आपल्या पतीसह संरक्षणाची मागणी केली.
यावेळी विमलाने सांगितले की, ती बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. “शिवाप्पाच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला मान्यता दिली आहे, पण माझ्या कुटुंबीयांनी मला घराबाहेर जाऊ दिले नाही. मी कशीबशी तिथून पळून आले,” अशी तिने आपली व्यथा मांडली.
अनुसूचित जातीतील असलेल्या या नवविवाहित जोडप्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्यात कुटुंबीयांकडून कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.








