- चोवीस लाखाच्या दागिन्यांसह गोव्यातील एकाला अटक
बेळगाव : कॅम्प पोलिसांनी सुमारे वर्षभरापूर्वी कॅम्प परिसरात घडलेल्या दोन घरफोड्यांचा छडा लावत गोव्यातील एका संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून १६० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे २४ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तंगराज सेल्वराज आचार्य (वय ४०, रा. म्हापसा, गोवा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गतवर्षी एप्रिल २०२५ मध्ये गणेशपूर सरस्वतीनगर येथील शिवराम गणपती भट्ट यांच्या घरात घरफोडी झाली होती. तसेच आठ महिन्यांपूर्वी मिलिटरी क्वॉर्टर्समध्येही अशीच घटना घडली होती. या दोन्ही प्रकरणांचा तपास कॅम्प पोलिसांकडून सुरू होता.
निरीक्षक आनंद वणकुद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संशयित तंगराज याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन्ही घरफोड्यांची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा करत १६० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले.
खडेबाजारचे एसीपी शेखराप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत निरीक्षक वणकुद्रे, उपनिरीक्षक ए. रुक्मिणी, उपनिरीक्षक आर. आय. सनदी तसेच बसवराज उज्जीनकोप्प, शिवानंद हेगडेन्नवर, वाय. एम. मुनवळ्ळी आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.







