• मागील वर्षाच्या तुलनेत खर्चात ९.३१ कोटींची वाढ
  • पोलीस बंदोबस्त, निवास आणि भोजन व्यवस्थेवर मोठा खर्च

बेळगाव : बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये २ ते ११ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या नऊ दिवसांच्या हिवाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी राज्य सरकारने यंदा ३८.५५ कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज तयार केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या खर्चात ९.३१ कोटी रुपयांची वाढ अपेक्षित असून, अधिवेशनाचा दररोजचा खर्च एक कोटी रुपयांहून अधिक होण्याची शक्यता आहे. २००६ पासून बेळगावमध्ये झालेल्या १४ अधिवेशनांवरील एकूण खर्चाचा आकडा आता सुमारे १९९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

जिल्हा प्रशासनाने अधिवेशनाच्या नियोजनासाठी विविध विभागांच्या खर्चाचे अंदाज तयार केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासाठी सर्वाधिक १८.६५ कोटी रुपये, पोलीस विभागासाठी ११.४३ कोटी रुपये, तर सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ८.४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या तीन विभागांच्या माध्यमातून अधिवेशनाच्या आयोजनासाठी एकूण ३८.५५ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

बेळगावमध्ये २००६ मध्ये पहिल्यांदा हिवाळी अधिवेशन झाले, त्यावेळी अवघे पाच कोटी रुपये खर्च झाले होते. त्यानंतर अधिवेशनाच्या आयोजनावरील खर्चात सातत्याने वाढ होत गेली. २०२३ मध्ये हा खर्च २३ कोटी रुपयांवर पोहोचला होता. मात्र, अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे २०२४ मध्ये खर्च १५.३० कोटी रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला होता. त्यानंतरच्या खर्चात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मागील अधिवेशनाच्या काळात दिल्लीतील बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. यापूर्वी अधिवेशनासाठी साधारण चार हजार पोलीस कर्मचारी तैनात केले जात होते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने ही संख्या वाढवून सहा हजार करण्यात आली होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्तासाठी ८.२४ कोटी रुपये खर्च झाले होते. एका वर्षातील अधिवेशनाचा एकूण खर्च २९.२४ कोटी रुपयांवर पोहोचला होता. त्यामध्ये उपायुक्त कार्यालयाचा १६ कोटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पाच कोटी रुपयांचा खर्च समाविष्ट होता.

अधिवेशनासाठी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सचिवालयीन अधिकारी, सरकारी कर्मचारी, पोलीस तसेच पत्रकारांसह मोठ्या संख्येने लोक बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. मागील वर्षी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भोजनासाठी दररोज सुमारे नऊ लाख रुपये खर्च होत होते. यंदा खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने भोजन व्यवस्थेवरील खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या भोजन व्यवस्थेत यंदा विशेष उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार उत्तर कर्नाटकातील विविध भागांतील पारंपरिक खाद्यपदार्थांचा समावेश दररोजच्या मेनूमध्ये केला जाणार आहे. यामुळे अधिवेशनात सहभागी होणाऱ्यांना या भागातील खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे.

निवास व्यवस्थेसाठी मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी, विधानसभा व विधान परिषद सचिवालयातील अधिकारी, पत्रकार, मार्शल आणि वाहनचालक यांच्यासाठी पाच हजारांहून अधिक खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. याशिवाय शहरातील विविध ठिकाणांहून सुवर्ण विधानसौधपर्यंत ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची व्यवस्था करावी लागणार आहे. बहुतेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी शहरात वास्तव्यास राहून दररोज अधिवेशनस्थळी येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेवरही मोठा खर्च अपेक्षित आहे.

एकूणच, अधिवेशनाच्या आयोजनासाठी सुरक्षा, भोजन, निवास आणि वाहतूक या प्रमुख बाबींवर मोठी आर्थिक तरतूद करावी लागत असून, यंदाचा ३८.५५ कोटी रुपयांचा प्रस्तावित खर्च बेळगावमधील हिवाळी अधिवेशनाच्या वाढत्या आर्थिक व्यापाची कल्पना देणारा ठरणार आहे.

हे अधिवेशन उत्तर कर्नाटकाच्या विकासाच्या गरजांवर चर्चा करण्यासाठी आणि प्रदीर्घ प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी एक व्यासपीठ ठरेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, वाढत्या खर्चामुळे, या अधिवेशनातून ठोस निर्णय घेतले जावेत, विकासकामांची अंमलबजावणी जलद व्हावी आणि या प्रदेशातील समस्यांवर उपाय निघावेत, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.