• नोव्हेंबर रोजी एक दिवस उपोषण करून सीमावासीयांच्या भावना व्यक्त करणार

बेळगाव : एका गुन्ह्याच्या प्रकरणात युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके आणि सरचिटणीस मनोहर हुंदरे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून हिंडलगा येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने अद्याप त्यांची जामिनावर सुटका झालेली नाही.

सीमाभागातील मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिन म्हणून पाळला जातो. कर्नाटक राज्याच्या निर्मितीच्या दिवसाला तत्कालीन केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून सीमावासीयांकडून मूक फेरी काढण्यात येते. यंदा काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर युवा नेते शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे यांच्या अटकेमुळे सीमाभागात संताप व्यक्त केला जात आहे.

काळ्या दिनाच्या मूक फेरीत प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसल्याने शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे यांनी १ नोव्हेंबर रोजी हिंडलगा कारागृहात एकदिवसीय अन्नत्याग सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून ते सीमावासीयांच्या भावना व्यक्त करणार आहेत.