- उद्या १ नोव्हेंबरला काळ्या दिनानिमित्त करी रोड येथे चौकसभा
- बेळगावसह ८६५ मराठी भाषिक गावांच्या महाराष्ट्रातील समावेशासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती, मुंबईचा पुढाकार
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या महाराष्ट्रात समावेशाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती, मुंबईच्या वतीने रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईत काळा दिन पाळण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता करी रोड नाक्याजवळील चौकात चौकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर आणि भालकीसह ८६५ मराठी भाषिक गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी कर्नाटक सरकारच्या विरोधात हा काळा दिन पाळण्यात येणार आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाकडे महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष वेधणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
या चौकसभेला आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यांतील शिवशाहू प्रतिष्ठान ग्रुपशी संबंधित विविध मंडळांच्या खोल्यांमधील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील मराठी बांधवांच्या लढ्याला मुंबईतून पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी करी रोड नाक्यावर सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे, असे आयोजकांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमाला करी रोड विभागाच्या नगरसेविका व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे, खासदार अरविंद सावंत, मनसेचे उपाध्यक्ष भाई जामदार, बंटी म्हशीकर यांच्यासह सीमाभागातील आणि मुंबई विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
हा कार्यक्रम शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने पार पाडण्यात येणार असून, सीमाप्रश्नाच्या समर्थनार्थ मुंबईतील मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती, मुंबईच्या वतीने करण्यात आले आहे.








