- पुणे – बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न
- वाहनांच्या लांबच लांब रांगा
बेळगाव : ऊसदरासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा संताप वाढला असून केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात त्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. राज्यभर आंदोलन सुरू असतानाच शेतकऱ्यांनी रस्ते अडवून जोरदार निदर्शने केली. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अथणी-गोकाक मार्गावरील दरूर पुलावरही शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
ऊसदरासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनामुळे बेळगाव जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.








