• कार्यालयांना भेट देऊन कागदपत्रांची तपासणी ; विकासकामांचा घेतला आढावा

बेळगाव : उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी गुरुवारी (दि. २९) बेळगाव शहर विकास प्राधिकरण (बुडा) आणि स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यालयीन नोंदी तपासण्याबरोबरच विविध विकासकामांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

बुडा कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी, रोख वह्या आणि हालचाल वह्यांची तपासणी केली. प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आलेल्या नवीन लेआउटमध्ये रस्ते, वीज जोडणी आणि गटार व्यवस्था करण्यात आली आहे की नाही, याची माहिती घेऊन प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश दिले. या तपासणीनंतर सविस्तर अहवाल सादर करण्यासही सांगितले.

प्राधिकरणाकडून लीजवर देण्यात आलेल्या सी.ए. साईट्सची माहिती तसेच विविध फायलींचीही त्यांनी तपासणी केली. त्यानंतर स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट देऊन कर्मचाऱ्यांची हजेरी आणि हालचाल वह्यांची पाहणी केली. प्रत्येक कर्मचाऱ्याने रोखवहीमध्ये सकाळी आणि संध्याकाळी आवश्यक नोंदी कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती घेतल्यानंतर उपलोकायुक्तांनी स्मार्ट सिटी कार्यालयाच्या रस्त्याची आणि आवाराची दुरुस्ती करून घेण्याचा सल्ला दिला.

यावेळी उपनिबंधक अरविंद, लोकायुक्त पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई, जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव के. एन. शिवकुमार, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पंचायत योजना संचालक रवि बंगारप्पनवर, महापालिका आयुक्त एम. कार्तिक, बुडा आयुक्त तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.