- दुकानातील माल जळून खाक ; सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील उत्तर भागातील अलतगा क्रॉसजवळ असलेल्या ‘भावेश्वरी स्वीट मार्ट’ या बेकरीला मंगळवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य आणि माल पूर्णपणे जळून खाक झाला असून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
माया सागर पाटील यांच्या मालकीच्या या दुकानात रात्री १० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची तीव्रता अधिक असल्याने दुकानातील साहित्य व मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत शेजारील रुपेश लक्ष्मण चौगुले आणि युवराज पाटील यांच्या मालमत्तेलाही फटका बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे विशेष साहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शासकीय उपाययोजनांतून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.








