•  महापौर प्रीती कामकर यांचे आवाहन
  • शिस्तबद्ध उत्सवासाठी महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना

बेळगाव : गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन महापालिकेच्या महापौर प्रीती कामकर यांनी केले.

महापालिकेत प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशमूर्तीची नगरसेवक व प्रशासनाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूजा केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी विघ्नहर्त्याने चांगला पाऊस पाडून जनतेला सुख, शांती आणि समृद्धी द्यावी, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

उपमहापौर हनुमंत कोंगाली म्हणाले, गणेशोत्सवापूर्वी जिल्हाधिकारी, पोलीस विभाग तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आणि उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकीत ठरविण्यात आलेल्या नियमांनुसार गणेशोत्सव शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

बेळगावचा गणेशोत्सव हा राज्यासाठी आदर्श आहे. त्यामुळे सर्वांनी श्रद्धा आणि भक्तीभावाने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी आयुक्त कार्तिक एम., सत्ताधारी पक्ष नेते संतोष पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रेयस नाकाडी, रमेश मैलुगोळ, राजू भातकांडे, सारिका पाटील यांच्यासह नगरसेवक आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.