• १५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा

बेळगाव : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगावमधील सफाई कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले. मालमत्ता हक्क, गृहनिर्माण सुविधा आणि इतर मूलभूत मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, अन्यथा १५ ऑगस्टनंतर तीव्र धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेचे सरचिटणीस तसेच जिल्हा देखरेख समितीचे सदस्य विजय निर्गट्टी यांनी सांगितले की, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माणासंदर्भातील प्रश्न सोडविण्यात आले आहेत. मात्र, बेळगावमध्ये केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. सुवर्णसौध अधिवेशन आणि सनदी अधिकारी दिनादरम्यानही आंदोलने करूनही प्रश्न प्रलंबितच राहिल्याचे त्यांनी नमूद केले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक वाघेला यांनी बेळगाव महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, एकूण ५५ अर्जांपैकी केवळ २५ जणांनाच मालमत्ता हक्क देण्यात आले असून, उर्वरित २५३ कर्मचाऱ्यांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. दावणगेरेच्या धर्तीवर बेळगावमध्येही सफाई कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

१५ ऑगस्टपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास कित्तूर येथील चन्नम्मा सर्कलमध्ये मानद अध्यक्ष मुनिस्वामी भंडारी यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने प्रशासनाला दिला आहे.