• हिरेबागेवाडी टोल नाक्यावर रास्तारोको
  • महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

बेळगाव : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री तथा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत हिरेबागेवाडी टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

मंत्रिमंडळात समावेशासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करूनही लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद न मिळाल्याने समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ समर्थक मोठ्या संख्येने हिरेबागेवाडी टोल प्लाझाजवळ एकत्र आले आणि राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन सुरू केले.

आंदोलनकर्त्यांनी काँग्रेस हायकमांड आणि राज्यातील पक्ष नेतृत्वाविरोधात घोषणाबाजी करत निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

यावेळी दर्गा अज्जन म्हणाले, “आमच्या हिरेबागेवाडी भागातून काँग्रेसचा कोणीही आमदार झालेला नव्हता. लक्ष्मी हेब्बाळकर निवडून आल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. सरकार आणि हायकमांड आमच्या कामाची दखल घेऊन त्यांना मंत्रिपद देईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र, ग्रामीण भागावर अन्याय झाल्याची भावना आज निर्माण झाली आहे. राहुल गांधी ग्रामीण भागाच्या विकासाची भाषा करतात, पण आमच्या भागावर अन्याय झाला आहे. जोपर्यंत आमच्या मोठ्या बहिणी लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील. अन्यथा आम्ही आणखी तीव्र आंदोलन छेडू.”

दरम्यान, आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.