- मुरगोड पोलिसांकडून आरोपीला अटक
- चिकबुदनूर गावातील घटना
- दगडाने ठेचून खून केल्याचा आरोप
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील चिकबुदनूर गावात मोबाईल फोनवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान एका मित्राच्या निर्घृण हत्येत झाले. या प्रकरणी मुरगोड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.
मृताची ओळख फकीरप्पा मल्लप्पा हिडकन्णावर (वय ४०) अशी झाली असून ते मजुरीचे काम करत होते. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मल्लिकार्जुन सिध्दप्पा पुजारी (वय २५) असे आहे. दोघेही मित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चिकबुदनूर गावातील लक्ष्मीदेवी मंदिराच्या आवारात सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फकीरप्पा यांनी मल्लिकार्जुन यांचा मोबाईल फोन घेतला होता. तो परत देण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
फकीरप्पा मंदिराच्या ओसरीवर झोपले असताना मल्लिकार्जुन तेथे आला आणि मोबाईल परत देण्याची मागणी केली. मात्र, फकीरप्पा यांनी मोबाईल रात्री देईन, असे सांगत तत्काळ परत देण्यास नकार दिल्याने दोघांतील वाद चिघळला.
वादाच्या भरात संतापलेल्या मल्लिकार्जुनने मंदिराच्या आवारात पडलेला मोठा दगड उचलून फकीरप्पा यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर दुखापत झाल्याने फकीरप्पा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताच्या पत्नी भारती हिडकन्णावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.








