- चिक्कोडी तालुक्यातील जोडकुर्ली येथील घटना ; घराचे मोठे नुकसान
चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील जोडकुर्ली गावात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने, घरातील सातही सदस्य वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.
गंगाव्वा वरळे यांच्या मालकीच्या घराची भिंत सलग पडणाऱ्या पावसामुळे अचानक कोसळली. घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करत होते. भिंत कोसळण्याचा आवाज आणि हालचाल लक्षात येताच त्यांनी तत्काळ घराबाहेर धाव घेतली.
यामुळे घरातील सातही जण सुरक्षित बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या दुर्घटनेत घराचे मोठे नुकसान झाले असून संबंधित कुटुंब बेघर झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बाधित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.








