- मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
बेंगळुरू : मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी प्रशासनाला गती देण्यास सुरुवात केली असून, सर्व विभागांतील प्रलंबित कामे २५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश देत भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका जाहीर केली आहे. विधानसौध येथे झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासनावर भर देत जनतेच्या समस्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज विधानसौध येथे सर्व विभागांच्या सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध विभागांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा घेत, त्यांची यादी तयार करून पुढील २५ दिवसांत ती पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
राज्य प्रशासनाने जात, धर्म किंवा कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीच्या दबावाखाली न येता सर्व कामे पारदर्शकपणे आणि नियमांनुसार करावीत, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, सामान्य नागरिकांना दिलासा देणारे प्रशासन हेच सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.
बैठकीत त्यांनी सर्व विभागांना पुढील १५ दिवसांत ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी गुंडगिरी, अमली पदार्थांची तस्करी, माफिया कारवाया आणि जुगार यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले.
राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या सहा प्रमुख कल्याणकारी योजनांची प्रभावी आणि तात्काळ अंमलबजावणी करण्यावरही मुख्यमंत्र्यांनी भर दिला. यावेळी बोलताना त्यांनी, “मला इतिहास वाचण्यापेक्षा नवे बदल घडवून इतिहास निर्माण करायचा आहे,” असे सांगत प्रशासनाने परिणामकारक कामगिरीद्वारे जनतेचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन केले.
आर्थिक शिस्त राखत विकासकामांना गती द्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना संवेदनशीलतेने प्रतिसाद द्या आणि नव्या विकास आराखड्यानुसार कामकाज करा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच बैठकीत शिवकुमार यांनी घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे प्रशासनात कार्यक्षमतेला प्राधान्य मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.








