बेळगाव : शहरातील भातकांडे शाळेसमोरील खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू करण्यात आले. अनेक महिन्यांपासून खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अखेर या मार्गाच्या दुरुस्तीला प्रारंभ झाल्याने व्यापारी, वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. व्यावसायिक कारणांसाठी चारचाकी वाहनांची वर्दळ असतानाच अवजड वाहनांचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परिसरात शाळा असल्याने विद्यार्थी आणि पालकांचीही सतत गर्दी असते. त्यामुळे रस्त्याची खराब अवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होती.
विशेषतः रस्त्यावरील खड्डे आणि उडणाऱ्या धुळीमुळे व्यापारी तसेच स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळाली. नगरसेवक राजू भातकांडे आणि स्थानिक आमदार यांच्या प्रयत्नांमुळे हे काम सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दुरुस्तीच्या कामामुळे काही प्रमाणात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी कपिलेश्वर कॉलनीमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अवजड वाहनांच्या प्रवेशावर तात्पुरती निर्बंध घालण्यात आले असून त्यांना गोवा वेस मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.
वाहतूक विभागाला याबाबत सूचना देण्यात आल्या असून आवश्यक ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. सध्या दुरुस्तीचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि सुविधाजनक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महत्त्वाच्या या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येवर तोडगा निघाल्याची भावना व्यक्त होत आहे.








