- सुदैवाने जीवितहानी टळली
- कार व मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक
- वाहनांचे मोठे नुकसान
चिक्कोडी : करोशी मार्गावरील करोशी येथील हुलियप्पा मंदिराजवळ कार आणि मालवाहू वाहनामध्ये समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हुक्केरी येथील बसगौडा पाटील हे आपल्या कुटुंबासह कारमधून चिक्कोडीकडे जात होते. त्याचवेळी मंजुनाथ हे मालवाहू वाहन घेऊन चिक्कोडीहून हुक्केरीकडे निघाले होते. करोशी येथील हुलियप्पा मंदिराजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी तीव्र होती की मालवाहू वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. तर कार चालकाने प्रसंगावधान राखल्याने कार रस्त्याच्या मध्यभागीच थांबली. या अपघातात कारच्या पुढील भागाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.
भीषण अपघात असूनही दोन्ही वाहनांतील सर्व प्रवासी सुखरूप बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.








