- म. ए. समितीच्यावतीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन
- भाषा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी २२ जूननंतर आंदोलनाचा इशारा
बेळगाव : सीमालढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करत मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठीचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत मराठी भाषिकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, तसेच २२ जूनपर्यंत भाषा वापराबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्यावतीने १ जून हुतात्मा दिनानिमित्त हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” तसेच कन्नड सक्तीविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
आपल्या मनोगतात प्रकाश मरगाळे म्हणाले की, सीमालढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान मराठी भाषिक कधीही विसरणार नाहीत. त्यांच्या त्यागामुळेच सीमाभागातील मराठी माणूस आजही आपल्या हक्कांसाठी लढत आहे. मराठी भाषिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने शक्य तितकी आंदोलने करून हा लढा पुढे नेला जाईल. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मराठी भाषिकांवर कोणत्याही प्रकारचा भाषिक अन्याय होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने सरकारी कार्यालये आणि खासगी संस्थांमध्ये ६० टक्के कन्नड व ४० टक्के इतर भाषांच्या वापरास परवानगी दिली आहे. मात्र, या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे २२ जूनपर्यंत संबंधित कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच सीमाप्रश्न निकाली निघेपर्यंत सर्व शासकीय कागदपत्रे कन्नडसोबत मराठीतही उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सीमाप्रश्नासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. सरकारने ६० टक्के कन्नड आणि ४० टक्के इतर भाषांच्या वापरास परवानगी दिली असतानाही बेळगाव महापालिकेकडून १०० टक्के कन्नडचा आग्रह धरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याच्या निषेधार्थ २२ जून रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार असून मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी संघर्ष करा, असे आवाहन केले. शिवसेना नेते प्रकाश शिरोळकर यांनीही हुतात्म्यांना आदरांजली वाहत मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सीमाभागातील जनतेसोबत ठामपणे उभा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर, शहर समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुसकर, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, आर. एम. चौगुले, सरस्वती पाटील, रवी साळुंके, आर. आय. पाटील, प्रकाश शिरोळकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








