• जिल्हा हादरला

विजयपूर : चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या थरारक गोळीबारात सहाजणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण भिमातीर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जमिनीच्या जुन्या वादातून हा सामूहिक हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदपूर गावातील निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. या वैमनस्यातूनच अज्ञात हल्लेखोरांनी गावात येऊन थेट गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात सहाजणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता पसरली असून सीमाभागातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

या सामूहिक हत्याकांडामुळे विजयपूर जिल्हा हादरला असून भिमातीर परिसरात पुन्हा एकदा रक्तपाताची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सुरू आहे.