• मंत्री सतीश जारकीहोळींचे सूचक वक्तव्य

बेंगळुरू : केपीसीसी अध्यक्षपद आणि राज्यातील नेतृत्व बदलाबाबत काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दुजोरा दिल्याने कर्नाटकाच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे हायकमांडसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केपीसीसी अध्यक्षपदात बदल करायचा की विद्यमान नेतृत्व कायम ठेवायचे, यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही नेते दिल्लीला जाणार असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. दिल्ली दौऱ्यानंतर सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार एकत्रितपणे पुढील निर्णय घेतील, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री बदलासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना त्यांनी सांगितले की, हायकमांड स्तरावर सर्व प्रक्रिया पक्षांतर्गत करारानुसार सुरू आहेत. आमदारांच्या सह्या गोळा केल्या जात असल्याच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदांच्या निर्मितीबाबतही राज्यात चर्चा सुरू असून, यावर अंतिम निर्णय विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर घेतला जाईल, असे जारकीहोळी यांनी सांगितले. अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदे निर्माण करण्याबाबतचा निर्णय पक्ष नेतृत्व घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.