- कार – टेम्पोची समोरासमोर धडक
बेळगाव : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाट परिसरात बुधवारी मध्यरात्री कार आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. रामनगर-अनमोड मार्गावरील गवेगाळी क्रॉस येथे घडलेल्या या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश पासिंगची कार (एपी 02 बीएएन 0292) गोव्याहून कर्नाटकच्या दिशेने येत होती. त्याचवेळी कोंबड्यांनी भरलेला टेम्पो (जीए 09 यू 6990) गोव्याच्या दिशेने जात होता. गवेगाळी क्रॉस येथे कार चालकाने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता समोरून भरधाव येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसली.
धडक इतकी जबरदस्त होती की कार आणि टेम्पोच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. टेम्पोतील कोंबड्याही रस्त्यावर विखुरल्या गेल्या. या अपघातात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले असून ते आंध्र प्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपघातात कार चालकासह टेम्पोमधील नवरा-बायको गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. बुधवारी रात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
सततचा पाऊस, घाट परिसरातील धोकादायक वळणे आणि भरधाव वाहनचालन यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.








