- बेळगावातील उपक्रम ठरला प्रभावी : २८६ घरफोड्या रोखण्यात यश
बेळगाव : घरफोडी आणि चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बेळगाव पोलिसांनी सुरू केलेली ‘लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम’ आता संपूर्ण कर्नाटकात लागू करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने राज्यभर त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी या उपक्रमाची दखल घेत सर्व जिल्हे आणि पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात तो राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहर आणि उपनगरांमध्ये फळे, भाजीपाला किंवा कपडे विक्रीच्या निमित्ताने फिरणाऱ्या काही गुन्हेगारांकडून बंद घरांवर लक्ष ठेवून चोरी आणि घरफोड्यांचे प्रकार घडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि तामिळनाडूसह विविध राज्यांतील गुन्हेगारांच्या हालचालीही आढळून आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला.
२६ जानेवारीपासून बेळगाव शहरात या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. प्रवास, कौटुंबिक कार्यक्रम किंवा इतर कारणांमुळे घर बंद ठेवून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी जवळच्या पोलीस स्थानकाला माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी विशेष मोबाईल क्रमांक आणि व्हॉट्सअॅप सुविधाही सुरू करण्यात आली. नागरिकांनी घराचा फोटो, लोकेशन, बाहेर जाण्याचा व परतण्याचा कालावधी तसेच घरासमोरील सेल्फी पाठवायची व्यवस्था करण्यात आली होती. ११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधूनही माहिती देता येत होती.
माहिती मिळाल्यानंतर संबंधित भागातील पोलीस कर्मचारी त्या घराभोवती नियमित गस्त घालत होते. त्याची नोंदही पोलीस स्थानकात ठेवण्यात येत होती. या उपाययोजनेमुळे बेळगावात तब्बल २८६ संभाव्य घरफोड्या रोखण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हा उपक्रम चोरी आणि घरफोडी रोखण्यासाठी प्रभावी ठरल्याने आता तो राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले.








