अंकली : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या मानाच्या अश्वांचे अंकली येथून आळंदीकडे प्रस्थान २७ जून रोजी होणार असल्याची माहिती उर्जितसिंगराजे शितोळे सरकार यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावात हा पारंपरिक सोहळा पार पडणार आहे. 

आळंदी ते पंढरपूर वारीतील मानाच्या अश्वांची परंपरा शितोळे घराण्याकडे असून, अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. यंदाचे वारीचे १९४ वे वर्ष असून त्यानिमित्त आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. शनिवार, २७ जून रोजी सकाळी दहा वाजता अंकली येथील शितोळे सरकार राजवाड्यातून मानाच्या अश्वांचे प्रस्थान होणार आहे. या वेळी वारकरी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अंकली ते आळंदी हा प्रवास सुमारे अकरा दिवसांचा असणार असून अश्वांसोबत २० ते २५ जणांचा लवाजमा सहभागी होणार आहे. ७ जुलै रोजी हे अश्व आळंदी येथे पोहोचतील.