• महाराष्ट्राकडे मदतीची मागणी
  • १३० हून अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

बेळगाव : महाराष्ट्रातील धरणांतून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यास होत असलेल्या विलंबामुळे उत्तर कर्नाटकातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत चालली आहे. कृष्णा नदीची पातळी झपाट्याने घटत असून अथणी, रायबाग आणि चिकोडी तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे.

सध्या अनेक गावांना आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात असून परिस्थिती आणखी बिकट झाल्यास दोन आठवड्यांतून एकदा पाणी सोडावे लागेल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून कृष्णा नदीत पाणी न आल्यास बेळगाव जिल्ह्यातील १३० हून अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा फटका बेळगावसह बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यातील गावांनाही बसू शकतो.

हिप्परगी बॅरेज परिसरातून बेळगाव जिल्ह्यातील १३ बहुग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या योजनांद्वारे अथणी, रायबाग आणि चिकोडी तालुक्यातील सुमारे १२० गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच बॅरेजच्या खालच्या भागातील ककसरी योजनेतून आणखी १४ गावांची पाण्याची गरज भागवली जाते.

दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २२ जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून वारणा धरणातून कृष्णा नदीत आणि उजनी धरणातून भीमा नदीत प्रत्येकी दोन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली आहे. उत्तर कर्नाटकातील नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. मात्र, अद्याप महाराष्ट्र सरकारकडून कोणताही ठोस निर्णय जाहीर झालेला नाही.