बेळगाव : बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज संघटना आणि कर्नाटक राज्य ब्रिज संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय राष्ट्रीय स्तरावरील ब्रिज स्पर्धेत अ गटात आनंद सामंत आणि शशिकांत शिंदे या जोडीने तर ब गटात कश्यप आणि क्लिफर्ड यांनी विजेतेपद पटकावले.
बेळगाव येथे पार पडलेल्या या स्पर्धेला देशभरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ५० हून अधिक जोड्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. अ गटात आनंद सामंत-शशिकांत शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर व्यंकटेश आणि कार्तिकेयन यांनी द्वितीय, तसेच राजेंद्र बर्वे आणि एम. आय. हेगडे यांनी तृतीय स्थान मिळवले.
ब गटात कश्यप आणि क्लिफर्ड यांनी अव्वल स्थान पटकावत अजिंक्यपद मिळवले. हरे राम उर्फ एच. डी. काद्रोलकर व विनायक सी. आर. यांनी द्वितीय, तर सुशील शर्मा आणि सुदाराम यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेनंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे सिद्धार्थ चंदगडकर, नितीन लोकूर आणि अभिजीत भागवत यांच्याहस्ते विजेत्या आणि मानकरी स्पर्धकांना रोख पारितोषिके तसेच सुहासचंद्र चंदगडकर व दिलीप भागवत स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष एस. वाय. प्रभू, आनंद गाडगीळ, सुब्रमण्यम, नंदकुमार देशपांडे आणि संतोष ममदापूर उपस्थित होते. स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा आणि बेंगळुरू येथील नामांकित ब्रिजपटूंनी सहभाग नोंदविला.







