बेळगाव : वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच एका विद्यार्थिनीने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

कावेरी उमेश नायक (वय २१) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती हुक्केरी तालुक्यातील कटबळी गावची रहिवासी होती. कावेरी बीएस्सीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती आणि बेळगावातील आझम नगर परिसरातील एका वसतिगृहात राहत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवस असल्यामुळे सकाळपासूनच कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि परिचितांकडून तिला शुभेच्छा दिल्या जात होत्या. दिवसभर ती वसतिगृहातच होती आणि काही जणांशी संवादही साधत होती. मात्र दुपारनंतर तिने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला.

रात्री जेवणासाठी बोलविण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने दरवाजा उघडून पाहिले असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस, संबंधित अधिकारी आणि तिचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीआयएमएस रुग्णालयात पाठविला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच कावेरीचा एका पोलीस कॉन्स्टेबलसोबत साखरपुडा झाला होता. तिच्या अचानक निधनामुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत.