बेळगाव : शहरात अलीकडच्या काळात घडलेल्या घरफोडीच्या घटनांमागील आंतरराज्य टोळीचा शहापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत टोळीचा प्रमुख संशयित मिंटू विश्वास याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून कार्यरत असलेल्या या टोळीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासासोबतच घटनास्थळी मिळालेल्या बोटांच्या ठशांचा आधार घेतला. त्यानंतर दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ४४ लाख ८६ हजार रुपये किमतीचे २९४ ग्रॅम सोन्याचे बिस्किट तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली आहे.
तपासादरम्यान ही टोळी कर्नाटकासह गोवा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली.
या यशस्वी मोहिमेबद्दल आयुक्तांनी शहापूर पोलिसांचे कौतुक केले असून, या अटकेमुळे विविध भागांतील जुन्या घरफोडीच्या गुन्ह्यांचाही तपास पुढे सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.







