अथणी : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यामध्ये अथणी तालुक्याच्या ग्रामीण भागातील सरकारी शाळेतील विद्यार्थिनीने एसएसएलसी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने ६२५ पैकी ६२५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
चिक्कोडी शिक्षण जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील कटगेरी गावातील सरकारी शाळेची विद्यार्थिनी प्रार्थना नागप्पा बिरादार हिने या परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.
शेतकरी कुटुंबातील असलेल्या प्रार्थनाने आर्थिक अडचणींवर मात करून कठोर परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. ग्रामीण सरकारी शाळेत शिक्षण घेत असतानाही तिने राज्यात अव्वल स्थान मिळवणे ही विशेष उल्लेखनीय बाब ठरली आहे. तिच्या या यशामुळे शाळेतील शिक्षक, पालक आणि गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत तिचे अभिनंदन केले आहे.








